मुंबई -भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू मिताली राज हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली, महिला क्रिकेटमधील पहिलीच खेळाडू ठरली आहे. १९९९ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. या विक्रमानंतर आता मितालीने पुन्हा एकदा दुसऱ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला संघात चौथा एकदिवसीय सामना लखनऊ येथे रंगला आहे. या सामन्यात मितालीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या सामन्यात तिने ४५ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची शार्लेट एडवर्ड्स आहे. शार्लेटच्या नावावर ५९९२ धावा आहेत.