मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदासाठी 'महामुकाबला' होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघातील वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी एलिसा हिली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून खेळणार आहे. पत्नी एलिसाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी स्टार्कने दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. यात आफ्रिकेने ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना आज (शनिवार) होणार आहे. पण या सामन्यातून स्टार्कने माघार घेत ऑस्ट्रेलिया गाठलं आहे. मिशेलच्या या निर्णयाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने देखील परवानगी दिली आहे.
याविषयी ऑस्ट्रेलिया प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितलं की, 'स्टार्कसाठी पत्नीला अंतिम सामन्यात खेळताना पाहणे ही विशेष गोष्ट असेल. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा त्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला आहे.'