ब्रिस्बेन- मार्नस लाबुशेन (१८५) आणि डेव्हिड वार्नर (१५४) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ५८० धावांचे डोंगर उभारला. यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात ३ बाद ६४ धावा केल्या आहेत.
पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ २४० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५८० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३४० धावांची आघाडी घेतली असून पाकिस्तानला डावाने पराभव टाळण्यासाठी २७६ धावा कराव्या लागणार आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शान मसूद (२७) आणि बाबर आझम (२०) ही जोडी नाबाद आहे.
पहिल्या डावा पाठोपाठ दुसऱ्या डावातही मिचेल स्टार्क पाकिस्तानसाठी धोकादायक ठरला. त्याने तिसऱ्या दिवसाच्या एका तासाचा खेळ शिल्लक असताना पाकचा सलामीवीर अझहर अली (५) आणि हॅरिस सोहेल (८) यांना बाद केले. तर पॅट कमिन्सने असद शफिकला बाद करत पाकिस्तानला बॅकफुटवर नेले.