मेलबर्न - वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा फलंदाज मिचेल मार्शने आपल्या वर्तवणूकीबद्दल माफी मागितली आहे. तस्मानिया संघाविरुद्ध बाद झाल्यानंतर, मार्शने ड्रेसिंग रूमच्या भिंतीवर जोरदार ठोसा मारला होता. त्यामुळे मार्शच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
हेही वाचा -'जहाज बुडाल्यावर उत्तम दुर्बिणीचा काय उपयोग?', नीशमचा आयसीसीला टोला
या प्रकरणानंतर मार्शच्या हाताला स्कॅन करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, मार्श आता सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे जवळच येऊन ठेपलेल्या कसोटी सामन्यांसाठी मार्श उपलब्ध असणार नाही. त्यामुळे त्याला संघात परत तेच स्थान मिळेल का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
'हे असं पहिल्यांदाच होत आहे आणि हा प्रकार परत होणार नाही याबद्दल मला खात्री आहे. आशा करतो की ही इतर लोकांसांठी चांगली शिकवण असेल', असे मार्शने म्हटले आहे. क्रिकेट ग्लोव्ज घातलेले असताना मार्शने हा ठोसा मारला होता. त्याने आपल्या संघाचीही माफी मागितली. या प्रकाराबद्दल मी खुप निराश असल्याचे मार्शने म्हटले आहे.