दुबई - सनरायझर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने आयपीएल 2020मधून माघार घेतली आहे. याची माहिती हैदराबाद संघाच्या व्यवस्थापनाने ट्विटद्वारे दिली. मार्शच्या जागेवर वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याचा हैदराबाद संघात समावेश करण्यात आला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मार्शला अंतिम संघात संधी दिली होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्याला गोलंदाजी दिली. सामन्यातील पाचव्या षटकादरम्यान गोलंदाजी करताना, फिंचने टोलावलेला चेंडू अडवत असताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु यात त्याला अपयश आले. अखेरीस विजय शंकरने मार्शचे उरलेले षटक पूर्ण केले होते. त्यानंतर मार्श फलंदाजीदरम्यानही, दहाव्या क्रमांकावर आला होता.
सामना संपल्यानंतर मार्शची तपासणी करण्यात आली. यात त्यांची दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे. मार्शच्या जागेवर डॅनिअल ख्रिश्चन किंवा मोहम्मद नबीचे नाव आघाडीवर होते. पण हैदराबादने जेसन होल्डरवर विश्वास दाखवत आपल्या संघात त्याला सामिल करून घेतले.