मुंबई- आयपीएल स्पर्धा खेळवायची की नाही, याचा निर्णय आयोजकांनी घ्यावा. यंदा आयपीएल घेऊ नका, असा आमचा सल्ला असेल. पण, तरीही त्यांना ही स्पर्धा खेळवायची असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली आहे. यामुळे आयपीएल बाबतचा अंतिम निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) आहे.
शनिवारी बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलचे भवितव्य स्पष्ट होईल.
कोरोना विषाणूने भारतासह जगभरातील १०० हून अधिक देशात हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जगभरात ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत आयपीएल घेऊ नका, असा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. पण त्यांनी या विषयीचा अंतिम निर्णय बीसीसीआयवर सोपवला आहे.
दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी आयपीएल खेळवत असाल तर प्रेक्षकांविना खेळवा, असा सल्ला दिला आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकने स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे चीनमधील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच चीनी खेळाडूंना भारतासह अनेक देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे संकटात सापडलेली आहे. तर आयपीएलवरही टांगती तलवार आहे.
हेही वाचा -BCCI ची कोंडी, IPL २०२० विषयावर उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश
हेही वाचा -NBA लीगमधील खेळाडूला कोरोनाची लागण, संपूर्ण स्पर्धाच केली रद्द