नवी दिल्ली -भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या निवडीनंतर, शास्त्री यांच्यासोबत शर्यतीत असलेले न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू माईक हेसन यांनी एक ट्विट केले आहे.
रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर हेसन यांनी ट्विटरद्वारे त्यांचे अभिनंदन केले. हेसन म्हणाले, 'रवी शास्त्री, तुमची प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्याबद्दल तुमचे अभिंनंदन. येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला आणि संघाला शुभेच्छा.'
हेसन यांच्या ट्विटला शास्त्री यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 'माइक धन्यवाद. प्रशिक्षकाचा झेंडा नेहमी फडकावत राहा', असे शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, यांच्यासह 2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. मात्र, रवी शास्त्री यांनी मुलाखतीत बाजी मारली.