लंडन -भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ४ कसोटी सामन्याची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. अखेरचे दोन सामने तर भारतीय संघाने एकतर्फा जिंकले. मालिका पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते, लवकरच एका खेळाडूला इंग्लंड संघातून डच्चू मिळेल.
इंग्लंड संघातून लवकरच जॉनी बेअरस्टोला वगळण्यात येऊ शकते, अशी भविष्यवाणी मायकल वॉन याने केली आहे. जॉनी बेअरस्टोला भारताविरुद्धच्या मालिकेत आपली छाप सोडता आली नाही. बेअरस्टो चार डावात फलंदाजी केली. यातील तीन डावात तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने २८ धावांची खेळी केली.
वॉन याने एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं की, 'बेअरस्टोला कसोटी संघातून डच्चू मिळणं जवळपास फिक्स आहे. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी बेअरस्टो संघात असेल, मला वाटत नाही.'