मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि त्याची पत्नी कायली यांनी सात वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी गुरूवारी घटस्फोटाची माहिती दिली. दरम्यान, क्लार्क आणि कायली यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एका मीडियाच्या वृत्तानुसार, हा घटस्फोट तब्बल ४० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास १९२ कोटी रुपयांच्या तडजोडीचा ठरला आहे.
या विषयी क्लार्क आणि कायलीने सांगितलं की, सात वर्ष संसार केल्यानंतर आम्ही एक अवघड निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला एकमेकांचा आदर आहे. आमच्या मुलीचा आम्ही दोघंही सांभाळ करणार आहोत.'
दरम्यान मायकल आणि कायली यांच्या घटस्फोटाला मायकलची असिस्टंट साशा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. साशा मायकलच्या क्रिकेट अकादमीचे कामकाज पाहते. काही दिवसांपूर्वीच दोघे सोबत फिरायला गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते.