दुबई - दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने IPL कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. सूर्यकुमार यादव (५१) आणि इशान किशन (नाबाद ५५) यांची अर्धशतकं आणि हार्दिक पांड्याची (नाबाद ३७) फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 143 धावांवर गारद झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.
दिल्लीचे शून्य धावांवर ३ गडी बाद
२०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ४६ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. मात्र, मार्कस स्टॉयनीसने अर्धशतक झलकवत कडवा प्रतिकार केला. पण बुमराहने त्याला त्रिफळाचीत केले.
डावाच्या सुरूवातीला आर अश्विनने उत्तम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला धक्के दिले. परंतु मुंबई धावांच्या वेगावर दिल्लीच्या गोलंदाजांना लगाम लावता आला नाही. इशान किशन आणि हार्दिक पांड्या या जोडीने दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तगडे आव्हान उभे केले. अश्विनने तीन गडी बाद केले.
मुंबईची दमदार सुरुवात
दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजासाठी आमंत्रित केले. तेव्हा क्विंटन डी कॉकने डॅनियल सॅम्सच्या पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्याने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला शून्यावर पायचीत करून तंबूत धाडलं. यानंतर सूर्यकुमार यादव व डी कॉक यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. डी कॉकला अश्विनने बाद करत ही जोडी फोडली. डी कॉकने २५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ४० धावा केल्या. त्याचा झेल शिखर धवनने टिपला.
इशान किशन आणि सूर्यकुमार यादव ही जोडी मैदानात स्थिरावली असे वाटत असतानाच, सूर्यकुमार नार्टजेचा बळी ठरला. त्याने ३८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासह ५१ धावा केल्या. यानंतर केरॉन पोलार्ड आल्या पावले माघारी परतला. त्याला अश्विनने भोपळाही फोडू दिला नाही. पोलार्डचा झेल रबाडाने टिपला. किशनने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. त्याला कृणाल पांड्याने चांगली साथ दिली. दोघांनी नॉर्टजेने टाकलेल्या १६व्या षटकात २ चौकार आणि १ षटकारासह १६ धावा वसूल केल्या. १७व्या षटकात स्टायनिसच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात कृणाला पांड्या बाद झाला. त्याने १३ धावा केल्या.
किशन-हार्दिक जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी १८व्या षटकात सॅम्सच्या गोलंदाजीवर १७धावा वसूल केल्या. हाच धडाका रबाडाने टाकलेल्या १९व्या षटकात देखील पाहायला मिळाला. दोघांनी या षटकात दोन षटकार आणि एक चौकारासह १८ धावा चोपल्या. किशनने ३० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५५ धावा केल्या. तर हार्दिकने ५ षटकारासह १४ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली. या दोघांनी २३ चेंडूत ६० धावांची भागिदारी केली. दिल्लीकडून अश्विनने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर नार्टजे आणि स्टायनिसने प्रत्येकी १ गडी टिपला.