नवी दिल्ली - आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. या सामन्याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात जुंपलेली पाहायला मिळाली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी एक ट्विट करत म्हटलं की अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच जिंकणार. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला अंतिम सामन्यात इतिहास घडवतील, अशा शब्दात मॉरिसन यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
शफाली वर्मावर भारताच्या फलंदाजीची भिस्त -
भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात १६ वर्षीय शफाली वर्माची भूमिका मोलाची ठरली. तिने साखळी फेरीतील चारही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. शफालीने चार सामन्यात ४० च्या सरासरीने १६१ धावा झोडपल्या. अंतिम सामन्यात शफालीची बॅट तळपणे गरजेचे आहे. शफालीसोबत सलामीवीर स्मृती मानधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज यांनाही चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
गोलंदाजांची मदार फिरकीवर -
पूनम यादवने विश्वकरंडकात ९ गडी बाद करत आपली छाप सोडली आहे. ती स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मेगान स्कटसह पहिल्या स्थानावर आहे. स्कटनेही ९ गडी बाद केले आहेत. यामुळे पूनमची फिरकी गोलंदाजी भारतासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पूनमशिवाय शिखा पांडे, राधा यादव आणि राजेश्वर गायकवाड यांनाही भेदक मारा करावा लागणार आहे.
असा आहे भारतीय संघ -
- हरमनप्रीत कौर (कर्णधार ), शफाली वर्मा, स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रिग्स, तानिया भाटिया, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, राधा यादव, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष आणि पूजा वस्त्रकार.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -
- मेग लेनिंग (कर्णधार), बेथ मूनी, रशेल हेन्स, अॅश्ले गार्डनर, डेलिसा किमिंस, एलिस पेरी, एरिन बर्न्स, एनाबेल सदरलँड, निकोला कँरी, एलिसा हिली, जेस जोनासन, सोफी मोलिनिक्स, मेगन स्कट, जॉर्जिया वेरहैम आणि मॉली स्ट्रेनो.