कोलकाता - भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. या क्रमवारीत अग्रवालने पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. मयांक आता १० व्या क्रमांकावर आला असून ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे.
हेही वाचा -माझ्यामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले - विराट कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र, स्मिथ आणि विराटमधील गुणांचे अंतर कमी झाले आहे. स्मिथ ९३१ गुणांसह अव्वल तर विराट ९२८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, रोहित शर्मा ३ स्थानांनी पिछाडीवर पडला आहे. १० व्या स्थानी असलेला रोहित आता १३ व्या स्थानी आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहिलेल्या जसप्रीत बुमराहचे स्थान एका स्थानाने घसरले आहे. तो या क्रमवारीत आता ५ व्या स्थानी आला आहे. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इशांत शर्माने ३ स्थानांची कमाई केली आहे. इशांतने ७१६ गुणांसह १७ वे स्थान पटकावले आहे. तर, उमेश यादव ६७२ गुणांसह २१ व्या क्रमांकावर आला आहे.