मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे सांगत अनिश्चित काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. सध्या मॅक्सवेल श्रीलंकेविरुध्द सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील २ सामने संपले असून राहिलेल्या मालिकेतूनही मॅक्सवेलने माघार घेतली आहे.
ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने अनेकदा फलंदाजीसह गोलंदाजीत करिश्मा दाखवत संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मात्र, सध्या त्याने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने, क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही मॅक्सवेलला पाठिंबा दर्शवला आहे.
याविषयी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'खेळाडूचे शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. हे आमचे कर्तव्य आहे. मॅक्सवेलच्या तब्येतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, यासाठी बोर्ड आवश्यक ती मदत करणार आहे.'