रांची - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ५८ षटकांत ३ बाद २२४ धावांपर्यंत मजल मारली आहे. मैदानातील अंधुक प्रकाशामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. भारताकडून रोहित शर्मा १६४ चेंडूत ११७ धावांवर तर अजिंक्य रहाणे ८३ धावांवर नाबाद आहे.
हेही वाचा -आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत हिटमॅनने रचले मोठे विक्रम
नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण मयंक अग्रवालला स्वस्तात माघारी परतावे लागले. त्यानंतर आलेला भरवशाचा चेतेश्वर पुजाराही खाते न उघडता माघारी परतला. संघाचे दोन फलंदाज तंबूत गेले असताना कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तोही अपयशी ठरला. एनरिच नॉर्तजेने विराट कोहलीला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. तेव्हा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताचा डाव सावरला.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १८५ धावांची भागीदारी केली. याच भागिदारीच्या जोरावर भारताने रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार पुनरागमन केले. रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावले. या मालिकेतले रोहितचे हे तिसरे शतक ठरले, तर कसोटी कारकिर्दीतलं हे सहावे शतक ठरले आहे. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने २ तर, एनरिच नॉर्तजेने १ बळी घेतलाआहे.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना रांचीच्या मैदानात रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकी कर्णधार फाफ डु-प्लेसिसच्या ठिकाणी टेम्बा बावुमा नाणेफेकसाठी आला होता. मात्र, त्यालाही नाणेफेक जिंकता आली नाही.