नागपूर- भारतीय संघाला आज (रविवारी) विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर बांगलादेश विरुध्दची टी-२० मालिका जिंकण्याची संधी आहे. भारत-बांगलादेश संघातील ३ सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना बांगलादेशने जिंकला तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत ठेवली. दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्वपूर्ण आहे. कारण युवा खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष्य आहे. मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात सावध पवित्रा राखूनच विजय साजरा करण्याचे आव्हान आज यजमान संघापुढे आहे.
कर्णधार विराट कोहली तसेच अन्य काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत काळजीवाहू कर्णधार रोहित शर्माला विजय मिळविण्यासोबतच आगामी विश्वचषकासाठी प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरला टी-२० क्रिकेट सामन्याचे यजमानपद मिळाले असून आज (रविवार) १० नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकून बरोबरीत आल्यामुळे तिसर्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
बांगलादेश संघाविरुध्द भारतीय संघाची बाजू भक्कम आहे. मात्र, बांगलादेशचा संघ नेहमीच अनपेक्षित निकाल लावू शकतो. यामुळे भारतीय संघाने बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. रोहित आणि धवन यांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. मात्र, केएल राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही.
श्रेयस अय्यरने मोक्याच्या क्षणी साजेशी कामगिरी केली आहे. पण ऋषभ पंतचे अपयश हे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. महत्वाचे म्हणजे त्याने यष्टिमागेही निराश केले आहे. त्यामुळे तिसर्या सामन्यात त्याला बसवले जावे, अशी मागणी होत आहे. पंतला पर्याय म्हणून संघात संजू सॅमसन हा पर्याय आहे. शिवाय मनीष पांडेला संधी देऊन राहुलला यष्टिमागे जबाबदारी सांभाळण्यास देता येईल.