लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीला थेट फेकीवर धावबाद करत मार्टिन गुप्टीलने सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला. धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या आशा संपल्या आणि भारताला पराभूत व्हावे लागले. हा सामना संपल्यानंतर गुप्टीलने न्यूझीलंडच्या वृत्तवाहिनीशी वार्तालाप केला. यामध्ये त्याने आपले मत व्यक्त केले.
उपांत्य सामन्यात माझे नशीब चांगले होते. त्यामुळे मी फेकलेला चेंडू थेट यष्टीवर आदळला आणि मैदानात जम बसलेला धोनी बाद झाला, अशी प्रतिक्रिया गुप्टीलने दिली.
धोनीच्या बॅटला लागून चेंडू हवेत उडाला असल्याचे मला दिसले. तेव्हा मी माझ्या जागेवरुन हललो नाही. मात्र, मी पुन्हा विचार केला की चेंडूवर जावे आणि मी धावत चेंडूवर गेलो. चेंडू हातात येताच मी तो थेट यष्टीकडे फेकला. तेव्हा तो चेंडू यष्टीवर आदळला. यामुळे धोनीला परतावे लागले आणि न्यूझीलंडच्या विजयातील मोठा अडसर दूर झाला. शेवटचा महत्त्वाचा गडी बाद करणे हे खूप चांगले असते, असे गुप्टील म्हणाला.
दरम्यान, सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत मार्टिन गुप्टील अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी तो संघाला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान देत आहे. भारतीय संघावर विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा सामना विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंड विरुध्द होणार आहे.