मेलबर्न - भारत दौऱ्यातील एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटीत दमदार कामगिरी करणारा मार्नस लाबुशेनला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. आज (मंगळवार) ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली असून उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मार्कस स्टॉयनिस, नॅथन लिऑन, नॅथन कोल्टर-नील आणि ग्लेन मॅक्सवेल यांना संघातून 'डच्चू' देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी (२०२०) एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया बोर्डाने १४ सदस्यीय खेळाडूंचा संघ घोषित केला. यात मार्नस लाबुशेनचा समावेश करण्यात आला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अॅलेक्स कॅरीला संधी मिळाली आहे. जेसन बेहरेनडॉर्फला मात्र, दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची कमान डेव्हिड वार्नर, अॅरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरीवर असणार आहेत. तर गोलंदाजीची धुरा मिचेल स्टार्क, सीन अॅबोट, केन रिचर्डसन, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा आणि अॅश्टोन टर्नर सांभाळतील.
ऑस्ट्रेलिया निवड समितीने सांगितल की, 'आम्ही कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील विजयाची मालिका कायम ठेऊन इच्छित आहेत. तसेच लाबुशेनने कसोटी चांगली कामगिरी केली आणि तो एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. यामुळे त्याची निवड संघात करण्यात आली.'
लाबुशेनने अॅशेस मालिकेपासून दमदार कामगिरी केली आहे. त्याने नुकताच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. दरम्यान, तो कसोटीत सातत्याने धावा करताना दिसत आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया निवड समितीने त्याला संघात स्थान दिले आहे.