दुबई- आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनने फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-५ मध्ये जागा मिळवली आहे. लाबुशेनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. याचा त्याला फायदा झाला आहे. त्याने डेव्हिड वार्नर आणि ज्यो रुटला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले.
मार्नस लाबुशेन २०१९ सालच्या सुरूवातीला कसोटी क्रमवारीत ११० क्रमांकावर होता. त्याने एका वर्षात दर्जेदार खेळ करत ५ वे स्थान पटकावले. लाबुशेन सध्या फुल्ल फॉर्मात आहे. त्याने जर हा धडाका कायम राखला तर अव्वलस्थान काबीज करणे त्याला कठिण नाही.
कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ९२८ गुणासह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आहे. त्याची गुणसंख्या ९११ इतकी आहे. केन विल्यमसन तिसऱ्या तर चौथ्या स्थानावर भारताचा चेतेश्वर पुजारा विराजमान आहे.