मुंबई -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकणार नाही, असे मत ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले. आता यात ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. त्या दिग्गजाने, टीम इंडिया कसोटी मालिकेत पुनरागमन करूच शकत नाही, असे म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉने असे मत व्यक्त केलं आहे. वॉ म्हणाला, टीम इंडियावर व्हाईटवॉशची नामुष्की येऊ शकते. टीम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ टीम इंडियाचा ४-० ने धुव्वा उडवेल.
मार्क वॉ याला विचारण्यात आले की, टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करू शकेल का? यावर उत्तर देताना वॉ म्हणाला की, नो होप म्हणजे काहीच आशाच नाही.
अॅडलेड कसोटी सामना जिंकण्याची संधी टीम इंडियाला होती. कारण या संघात विराट कोहली होता. आता टीम इंडिया जिंकण्याची शक्यताच नाही. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडिया उलटफेर करू शकत नाही. यजमान ऑस्ट्रेलिया संघ व्हाईटवॉश देईल, असे वॉ म्हणाला.
दरम्यान, अॅडलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी मिळवली होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर टीम इंडियाच्या धुरंधरांनी शरणागती पत्कारली. उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघात दुसरा सामना २६ डिसेंबर पासून मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे.
हेही वाचा -IND Vs AUS : मेलबर्न कसोटी खेळणार की नाही, स्मिथने स्वत:च दिले अपडेट
हेही वाचा -मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर रैनाची प्रतिक्रिया आली समोर...