कोलंबो -भारतीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला पुढील महिन्यापासून सुरू होणार्या लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात भाग घेतील. एलपीएल ड्राफ्टमध्ये लीगच्या पाच फ्रेंचायझींनी जगभरातील खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले.
फ्रेंचायझी कोलंबो किंग्जने गोनी आणि बिस्लाला आपल्या संघात सामील केले. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गोनी आतापर्यंत भारतासाठी दोन एकदिवसीय सामने खेळला आहे. ४४ वर्षीय गोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ४४ सामने खेळले आहेत. तर, यष्टीरक्षक फलंदाज बिस्लाने आतापर्यंत ३५ आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने ७९८ धावा केल्या आहेत.
कोलंबो किंग्जने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेलचा देखील समावेश केला आहे. दुसरा संघ कँडी टस्कर्सने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि लियाम प्लंकेट यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. तिसरा संघ गॅले ग्लेडिएटर्सने स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, शाहिद आफ्रिदी आणि कॉलिन इंग्राम यांना संघात स्थान दिले आहे. एलपीएलचा चौथा संघ डम्बुला हॉक्सने दशून शनाका डेव्हिड मिलर आणि कार्लोस ब्रेथवेटला संघात घेतले आहे. जॉन लुईस या संघाचे प्रशिक्षक असतील.
त्याचबरोबर लीगचा पाचवा संघ असलेल्या जाफना स्टॅलियन्सने थिसारा परेरा व्यतिरिक्त डेव्हिड मलान आणि वनिंदू हसरंगाला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. लंका प्रीमियर लीग २१ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि १३ डिसेंबरपर्यंत चालेल. २३ सामन्यांची एलपीएल लीग रांगीरी डम्बुल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सूरीयावेवा महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल.