रांची -भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून धोनी निवृत्ती घेणार असल्याचे निवृत्तीच्या चर्चाही रंगल्या होत्या. धोनीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आता धोनीचा हॅलिकॉप्टर शॉट क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखले जाते. परंतु धोनीच्या या अनोख्या शॉटमागे नक्की कोणाची प्रेरणा आहे? हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट 'फिनिशर' मानला जाते. धोनीचा बालपणीचा मित्र संतोष लालने धोनीला या शॉटविषयी कल्पना दिली. इतकेच नव्हे तर, धोनीला हा शॉट खेळण्यासाठी मदतही केली. धोनी आणि संतोष लहानपणापासूनच एकत्र क्रिकेट खेळत असत. दोघांनीही टेनिस बॉलचा क्रिकेट खेळण्यासाठी वापर केला. संतोषची फलंदाजी पाहणे धोनीला खूप आवडत असे. संतोष धडाकेबाज फलंदाज होता. संतोषकडून हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी धोनी त्याला गरम समोसे खायला घालत असे.
संतोष आणि धोनी हे लहानपणापासूनच चांगले मित्र होते. दोघांनीही रेल्वेमध्ये एकत्र काम केले आहे. जेव्हा धोनीने संतोषला प्रथम हा शॉट खेळताना पाहिले तेव्हा धोनीने तत्काळ संतोषला या शॉटबद्दल विचारले. संतोषने या शॉटचे वर्णन 'थप्पड शॉट' असे केले.
संतोषच्या स्वादुपिंडाला सूज होती. धोनी जेव्हा टीम इंडियाबरोबर दौऱ्यावर जाणार होता, तेव्हा त्याला संतोषच्या या आजारबद्दल समजले. संतोषला तातडीने रांची येथून दिल्ली येथे नेण्यासाठी धोनीने एअर अँम्ब्युलेंसची व्यवस्था केली. परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला वाराणसीतच लँड व्हावे लागले. तोपर्यंत संतोषला उशीर झाला होता. वयाच्या 32 व्या वर्षी संतोषचे निधन झाले.