नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या मध्य प्रदेशचा फलंदाज आर्यमान बिर्लाने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ वर्षीय फलंदाज आर्यमानने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरला आयपीएलच्या ८ वेगवेगळ्या संघांकडून खेळणारा एकमेव खेळाडू
९४ हजार कोटींचे मालक असलेले उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमान याने ट्विटरवर लिहिले की, 'मी येथे पोहोचलेल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि धैर्याचा प्रवास आहे. परंतु या खेळाशी संबंधित चिंतांना सामोरे जाणे मला थोडे कठीण गेले आहे. तो पुढे म्हणाला, 'मी स्वत:मध्ये अडकल्याचे मला वाटत आहे. आतापर्यंत मी सर्व समस्यांचा सामना केला आहे. परंतु आता मला माझे मानसिक आरोग्य आणि माझी आवड सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची आहे. म्हणून मी अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुंदर खेळ माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे आणि मला आशा आहे की मी योग्य वेळी परत येईन.'
२०१७ मध्ये आर्यमानने मध्य प्रदेशसाठी रणजी स्पर्धेतून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्सने २०१८ च्या हंगामासाठी आर्यमानचा संघात समावेश केला होता. तथापि, गेल्या दोन मोसमात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला नव्हता. गुरुवारी, पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी राजस्थानने आर्यमानला रिलीज केले होते.