मुंबई - बीसीसीआयने नुकतीच क्रिकेट सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या तिघांची नावे जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्राची सुलक्षणा नाईक यांचे नाव आहे. नाईक यांच्या निवडीने महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. यांची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांच्यासह माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
निवड समिती सदस्यांची निवड असो किंवा भारताच्या प्रशिक्षकांची निवड या मोठ्या गोष्टींमध्ये क्रिकेट सल्लागार समितीची महत्वाची भूमिका असते. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.
दरम्यान कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश असलेल्या निवड सल्लागार समितीने हित जोपसण्याचा आरोप झाल्यानंतर पदाचा त्याग केला होता. यामुळे नव्याने सल्लागार समिती निवडण्यात आली आहे.