लंडन -पाकिस्तान आणि इंग्लंडच्या काउंटी मिडिलसेक्सचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजवर इंग्लंड क्रिकेटच्या घरगुती स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. त्यांची गोलंदाजी अवैध ठरवल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -अश्विनने केला असा 'कारनामा' जो दशकात कोणाला जमला नाही..
हाफीजची गोलंदाजीची शैली सदोष असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. एका मीडियासंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 30 ऑगस्ट रोजी टी-२० ब्लास्टमध्ये टॉन्टन येथे सॉमरसेट आणि मिडलसेक्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या गोलंदाजीच्या शैलीविरूद्ध ठपका ठेवण्यात आला. या सामन्यात हाफीजला एबी डीव्हिलियर्सच्या जागी मिडलसेक्समध्ये स्थान मिळाले होते. स्वतंत्र समितीने या प्रकरणाचा तपास केला, त्यानंतर निर्णय घेण्यात आला.
चेंडू टाकताना हाफीजचे कोपर १५ डिग्रीपेक्षा जास्त अंतरात वळते, असे या चाचणीतून निष्पन्न झाले आहे. 'माझ्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल मला ईसीबी गोलंदाजीचा आढावा समूहाचा अहवाल मिळाला. मी त्या अहवालास मान्यता दिली. ईसीबीच्या नियमांनुसार मी आयसीसीच्या मान्यताप्राप्त केंद्रावर स्वतंत्र तपासणीसाठी तयार आहे जेणेकरुन मी ईसीबी स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरू शकतो', असे हाफीजने निवेदनात म्हटले. गेल्या पाच वर्षांत हाफीजवर बंदी घातल्याची ही चौथी वेळ आहे.