मुंबई- टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा जगातील सर्वात मोठे स्टेडियम अशी ओळख असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यासाठी उत्सुक झाला आहे. बीसीसीआयने मोटेरा स्टेडियमचा आकाशातून काढलेला फोटो ट्विट केला होता. त्यावर रोहितने आपली इच्छा व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले होते. त्यांची दुखापत गंभीर असल्याने त्याने उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. सद्या तो विश्रांती घेत आहे.
दरम्यान मोटेरा हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे. हे स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये आहे. 'सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम'चा कायापालट करण्यात आला असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे मोटेरा स्टेडियम लवकरच क्रीडा सामन्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारीला या स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
मोटेराची आसन क्षमता १ लाख १० हजार आहे. या स्टेडियमआधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जात होते. मात्र, मेलबर्न आता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन्सचा क्रमांक लागतो. मेलबर्नची क्षमता एक लाख असून ईडन गार्डन्सची ६६ हजार इतकी आहे.