मेलबर्न- जागतिक महिला दिनी रंगलेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताचा ८५ धावांनी धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाचवे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले. ऑसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीने नाबाद अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.
ऑस्ट्रेलियाचे १८५ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला डावाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेली भारतीय सलामीवीर शफाली वर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाली. तिला मेगन स्कटने हिलीकरवी झेलबाद केले. शफाली बाद झाल्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली. तेव्हा जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात आली. तिला जेस जोनासेनने भोपळा फोडू दिला नाही. जेमिमाचा झेल निकोला कॅरीने घेतला.
स्मृती मानधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीवर भारताची आशा होती. पण स्मृती ११ धावांवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत (४) जोनासेनचा शिकार ठरली. या दोघी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ५.४ षटकात ४ बाद ३० अशी झाली. तेव्हा वेदा कृष्णमूर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.