सिडनी - पावसामुळे चार तासांचा खेळ वाया गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर ५५ षटकात २ बाद १६६ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन ६७ तर स्टिव्ह स्मिथ ३१ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना आजपासून सिडनीमध्ये खेळला जात आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सिराजने स्वस्तात बाद केले. वॉर्नरचा (५) झेल पुजाराने टिपला. यानंतर काही षटके झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यात चार तासांचा खेळ वाया गेला.
पाऊस थांबल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात झाली. तेव्हा पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या विल पुकोवस्की आणि मार्नस लाबूशेनने सावध खेळ केला. दोघांनी पहिल्यादा अर्धशतकी भागिदारी करत संघाला सुस्थितीत आणले. यानंतर चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने एका गड्याच्या मोबदल्यात ९३ धावा केल्या होत्या. यादरम्यान, पुकोवस्की दमदार पदार्पण करत अर्धशतकी खेळी केली.
पुकोवस्की-लाबूशेन यांच्यात शतकी भागिदारी झाली. तेव्हा भारताकडून पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या नवदीप सैनीने दुसरे यश मिळवून दिले. त्याने पुकोवस्कीला पायचित केले. पुकोवस्कीने ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावांची खेळी साकारली.
पुकोवस्की बाद झाल्यानंतर लाबूशेन-स्मिथ जोडीने बुमराह, अश्विन, सैनी आणि सिराजचा खंबीरपणे सामना केला. दोघांनी पहिल्या दिवसाअखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही. लाबूशेन-स्मिथने नाबाद अर्धशतकी भागिदारी केली. यादरम्यान, लाबूशेनने अर्धशतक झळकावले. भारताकडून सिराज आणि सैनी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.