सिडनी -रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर २ बाद १०३ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन ४७ तर स्टिव्ह स्मिथ २९ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावातील मिळून एकूण १९७ धावांची आघाडी झाली आहे.
पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत अपयशी ठरले. तर जडेजाने तळातील फलंदाजांना घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जाडेजाने नाबाद २८ धावांची खेळी केली. अखेरीस भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाली.
तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे बाद झाल्यानंतर हनुमा विहारी धावबाद झाला. तेव्हा पंत-पुजारा या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्या चेंडूवर हेजलवूडने पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. यानंतर आर. अश्विन (१०), जसप्रीत बुमराह (००), नवदीप सैनी (३) आणि मोहम्मद सिराज (६) झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक चार बळी घेतले. तर हेजलवूडने दोन गडी टिपले. तर स्टार्कला एक विकेट मिळाली.