मुंबई- कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या खडतर परिस्थितीत आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचवणे हे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते, असे मत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भरवशाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्त केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल, असे दिसत नाही.
सुरेश रैना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, 'सध्याच्या घडीला लोकांचा जीव वाचवणे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते. सद्या आपण सर्वांनी सरकारने दिलेल्या निर्देश आणि सूचनाचे पालन करणे गरजेचे आहे. याचे पालन आपण केले नाही तर परिणामही आपल्यालाच भोगावे लागतील.'
परिस्थिती सुधारली की आयपीएलचा विचार करता येईल. सध्या अनेक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे, असेही रैना म्हणाला.