दुबई - ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रमवारीत बरेच धक्कादायक बदल पाहायला मिळाले. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. पण, त्यांना केवळ १४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेल्या मार्नस लाबुशेनने जोरदार टक्कर दिली आहे. लाबुशेनने क्रमवारीत तिसरे स्थान काबीज केले आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेदरम्यान, स्टिव्ह स्मिथला दुखापत झाली. यामुळे त्याच्या ठिकाणी मार्नस लाबुशेनची संघात निवड करण्यात आली. त्याने अॅशेस मालिका आणि त्यानंतर झालेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तर लाबुशेन मालिकावीर ठरला. याच सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ लाबुशेनला मिळाले असून त्याने थेट तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली आहे. त्याने हा फॉर्म कायम राहिल्यास तो अव्वल स्थानही पटकावू शकतो.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला दोन स्थानांचा फटका बसला आहे. तो ७ व्या स्थानावरुन ९ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा केन विलियम्सन, चेतेश्वर पुजारा आणि बाबर आझम यांची प्रत्येकी एक स्थानांची घसरण झाली. बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर ५ स्थानांची झेप घेताना टॉप-१० मध्ये एन्ट्री घेतली आहे.