मुंबई - मुंबई इंडियन्सचा स्टार अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल २०२० स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली. मलिंगाने आपण व्यक्तिगत कारणामुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही, असे संघ व्यवस्थापनाला कळवले आहे. तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे.
लसिथ मलिंगाने आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरला पायचित करत मुंबईच्या संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. १२ हंगामात मलिंगाने १६ गडी बाद केले होते. यामुळे १३ हंगामातही मलिंगा मुंबईसाठी महत्वाचा खेळाडू होता. पण त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे.
लसिथ मलिंगाची जागा 'हा' खेळाडू घेणार -
लसिथ मलिंगाच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा समावेश करण्यात आला आहे. तो या आठवड्याच्या अखेरीस अबू धाबीतील मुंबई संघाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी जेम्स पॅटीन्सनचे संघात स्वागत केले. तसेच, मलिंगाला हवी ती मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.