अबुधाबी -आयपीएलचा आजचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर ४८ धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिलेले १९२ धावांचे आव्हान पंजाबला पूर्ण करता आले नाही. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ८ गडी बाद १३२ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्याचा मानकरी ठरला.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने फटकेबाजी करत २० षटकात १९१ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने ७० धावांची खेळी केली, तर शेवटच्या षटकांमध्ये पोलार्ड आणि पांड्या या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पोलार्डने २० चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत ३० धावांवर नाबाद राहिला. पंजाबपुढे विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य होते.
पंजाबचा कर्णधार के. एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब झाली. फॉर्मशी झुंजणारा क्विंटन डी कॉक अपयशी ठरला. पहिल्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केले. पुढच्या षटकात रोहित शर्माने गोलंदाज मोहम्मद शमीचे चौकाराने स्वागत केले. त्यानंतर चौथ्या षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना सूर्यकुमार यादव धावचीत झाला. मोहम्मद शमीने फेकलेला थ्रो थेट स्टंपवर लागला आणि सूर्यकुमार यादव १० धावांवर माघारी परतला.
रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीने संघाचे अर्धशतक आठव्या षटकात पूर्ण केले. या जोडीने मुंबईचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. गौतमने इशानचा अडथळा दूर केला. त्याने इशानला नायरकरवी झेलबाद केले. इशानने १ चौकार आणि १ षटकारासह २८ धावांची भर घातली. यानंतर केरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा या जोडीने आक्रमक पावित्रा घेत धावगती वाढवली. यादरम्यान, रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहितने १६ व्या षटकात नीशमचा खरपूस समाचार घेतला. त्याने नीशनच्या या षटकात २२ धावा वसूल केल्या. रोहितने ४२ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. त्याचा अडथळा शमीने दूर केला. रोहित बाद झाल्यानंतर पोलार्ड आणि हार्दिक पांड्या या जोडीने पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. दोघांनी २३ चेंडूत नाबाद ६७ धावा जोडल्या. पोलार्ड ४७ तर हार्दिक ३० धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून शेल्डन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि गौतम यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.