मोहाली- आयपीएलच्या ५२ व्या सामन्यात कोलकात्याने पंजाबर ७ गडी राखून विजय मिळविला आहे. पंजाबने कोलकात्यापुढे विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कोलकाताने हे आव्हान ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. या विजयामुळे कोलकाताच्या प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
१८४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या कोलकाताच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरूवात केली. लीन आणि गील यांनी ६२ धावांची सलामी दिली. ख्रिस लीन ४६ धावा काढून ट्रायच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने ४९ चेंडूत ६५ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
रॉबिन उथप्पा २२, आंद्रे रसेल २४ तर दिनेश कार्तिकने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि अॅन्ड्रयू ट्राय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
पंजाबने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या संदिप वॉरियरने भेदक गोलंदाजी करत लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांना स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे पंजाबला आक्रमक सुरुवात करता आली नाही. मंयक अगरवाल ३६, निकोलस पूरन ४८ तर सॅम करनने ४७ धावांचे योगदान दिले.
सॅम करनने २४ चेंडूत ५५ धावा कुटल्या. त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने १८३ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. कोलकाताकडून संदि वॉरियर २, हॅरी गर्नी, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.