राजकोट - येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात भारताने कांगारूंचा ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या कुलदीप यादवने मोठी कामगिरी नोंदवली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १०० बळी घेणारा कुलदीप हा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
हेही वाचा -आई बनल्यानंतर सानियाची दमदार वापसी, जिंकली होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा
कुलदीपने ५८ सामन्यात ही कामगिरी केली. त्याच्या अगोदर २००३ मध्ये भारताच्या हरभजन सिंगने ७६ व्या सामन्यात १०० बळी घेतले होते. एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी सर्वात वेगवान १०० विकेट्स नोंदवणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ५६ सामन्यात तर, बुमराहने ५७ सामन्यात ही किमया केली आहे.
या यादीत अफगाणिस्तानच्या राशिद खान अव्वल क्रमांकावर आहे तर पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सक्लेन मुश्ताक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राशिदने ४४ सामन्यात तर मुश्ताक यांनी ५३ सामन्यात हा पराक्रम केला. वॉर्नने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील ६० सामन्यात १०० वनडे विकेट्स घेण्याचा हा पराक्रम केला होता.
एकदिवसीय कारकीर्दीत सर्वात जलद १०० विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज -
- ५६ सामने - मोहम्मद शमी.
- ५७ सामने - जसप्रीत बुमराह.
- ५८ सामने - कुलदीप यादव.
- ५९ सामने - इरफान पठाण.
- ६५ सामने - झहीर खान.