हैदराबाद - आयपीएल २०२१ हंगामासाठी आयोजन ठिकाणाच्या यादीत हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करत बीसीसीआय आणि आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांना अपील केलं आहे.
रामाराव यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. मी आगामी आयपीएल स्पर्धेच्या आयोजन ठिकाणात हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी अपील बीसीसीआय आणि आयपीएल पदाधिकाऱ्यांना करतो. भारतातील मेट्रो शहराच्या तुलनेत हैदराबाद शहरात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. तसेच आम्ही कोरोना रुग्णांचा आकडा आणखी कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करत आहोत. आम्ही तुम्हाला सरकारकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन देतो, अशा आशयाचे ट्विट रामाराव यांनी केलं आहे.