नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी हिटमॅन रोहित शर्माचे कौतुक केले आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिग्गज सलामीवीरांपैकी एक असल्याचे श्रीकांत म्हणाले.
श्रीकांत म्हणाले, ''जागतिक क्रिकेटमधील सर्वात महान सलामीवीर म्हणून मी रोहितची निवड करतो. रोहित शर्माचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो सहजपणे शतक किंवा दुहेरी शतक ठोकतो. जे फार आश्चर्यकारक आहे.''
रोहितने एकदिवसीय सामन्यात 29 शतके ठोकली आहेत. त्यापैकी 11 वेळा त्याने 140 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताकडून 43 कसोटी आणि 146 एकदिवसीय सामने खेळलेले श्रीकांत म्हणाले, ''जर तुम्ही एकदिवसीय सामन्यात 150, 180, 200 धावा काढल्या तर कल्पना करा की तुम्ही संघला कोठे घेऊन जात आहात. रोहितचे हे मोठेपण आहे.''
30 वर्षीय रोहितने 224 एकदिवसीय सामन्यात 49.27 च्या सरासरीने 9115 धावा केल्या आहेत. यात 29 शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 264 धावा असून हा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रम आहे. त्याने 32 कसोटी सामन्यात 2141 धावा केल्या आहेत.