बंगळुरू - कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅचफिक्सिंग प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. सय्यम असे या आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाचे नाव असून तो हरियाणाचा राहिवाशी आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी काही क्रिकेटपटूना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडून केला जात होता. या तपासादरम्यान, गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, सय्यमच्या विरोधात सट्टेबाजीच्या आरोपांमुळे लूक-आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.
कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी निशांत सिंह शेखावत याच्यासह बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. गौतम आणि काझी यांनी २०१९ च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचे समोर आले होते.