मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधानांच्या या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तींनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणतो, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी साऱ्यांना विनंती करतो की कोरोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया.'
भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंग म्हणतो, 'पुढील २१ दिवस हे भारतासाठी आणि आपल्या जीवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नागरिक, मुलगा, मुलगी, आई, वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण अशा सगळ्या नात्यांनी आपली जबाबदारी ओळखा. कारण कोरोना रोखण्याचा हा एकमेव उपाय आहे.'