मुंबई - न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जाग आली आहे. पराभवानंतर विराटने संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याने जलदगती गोलंदाजांचे वाढते वय विचारात घेता, भविष्यात नवी पिढी घडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
याविषयी विराट म्हणाला, 'जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांचे वय वाढत जाणार आहे. हे आता तरुण असणार नाहीत. त्यामुळे आम्हाला अशा खेळाडूंचा विचार करायला हवा जे सध्याच्या खेळाडूंची जागा घेऊ शकतील. जर एखाद्या सामन्यात दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले तर त्यावेळी पोकळी भरून काढणे भारतीय संघाला अवघड जाईल.'
भविष्याचा विचार करून जलदगती गोलंदाजांमध्ये नवदीप सैनीचा समावेश संघात केला जाईल. तसेच सैनी शिवाय आणखी दोन-तीन गोलंदाजांवर आमची नजर आहे, असेही विराट म्हणाला. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. पहिल्या कसोटीत त्याने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला होता.