नवी दिल्ली - भारत आणि बांग्लादेश दरम्यान डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे दोन्ही संघांमध्ये 'पिंक बॉल' कसोटी सामना होणार आहे. मात्र, या ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरच्या क्रिकेट स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रशिक्षण घेणार आहे.
हेही वाचा -पाकचा माजी गोलंदाज म्हणतो, टीम इंडियाच टी-२० चा 'बॉस'
या सामन्याआधी, भारतीय संघाने मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडे (एमपीपीए) गुलाबी चेंडूने रात्री प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. एमपीपीएचे सचिव मिलिंद कानमाडीकर यांनीही या मागणीला मान्य केले असून गुलाबी चेंडूने खेळण्याची सवय लावण्यासाठी खेळाडूंना मदत करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे.
कोलकातामधील 'ईडन गार्डन्स' येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी गुलाबी चेंडूने प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. 'मी खूप उत्साही आहे. हे एक नवीन आव्हान आहे. सामना कसा असेल हे मला माहीत नाही, परंतु प्रशिक्षण सत्राद्वारे आम्हाला याची कल्पना येईल. प्रशिक्षणानंतरच आम्हाला प्रत्येक सत्रात गुलाबी चेंडू किती फिरतो आणि कसा कार्य करतो याची कल्पना येईल. चाहत्यांच्या दृष्टीकोनातून ते मनोरंजक असेल', असे रहाणेने म्हटले आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये डे-नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. मात्र, भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होत आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुलाबी रंगाचा चेंडू वापरून डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार असल्याने त्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.