हैदराबाद - किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात ६९ चेंडूत १३२ धावांची आतषबाजी खेळी केली. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. राहुलने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
राहुलची ही खेळीही आयपीएलच्या इतिहासातील कर्णधाराने झळकावलेली सर्वोच्च खेळी ठरली. २०१७च्या हंगामात डेव्हिड वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपद भूषवताना ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. कोलकाताविरोधात त्याने हा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम राहुलने मोडित काढला.