मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा स्टार खेळाडू दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो ही चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी फलंदाज लोकेश राहुल तंदुरूस्त झाला असून तो चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे. चेन्नईसाठी निघतानाचा फोटो राहुलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
दरम्यान, के एल राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या दोन कसोटीपूर्वी दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी आला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
राहुलने विमानात बसताना एक फोटो ट्विट केला आहे. त्यासोबत त्याने, मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे, हे सांगताना आनंद होत आहे. यापेक्षा चांगली फिलींग असूच शकत नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी उत्सुक आहे, असे म्हटलं आहे.