नवी दिल्ली -भारताच्या एकदिवसीय संघात सध्या लोकेश राहुल पाचव्या क्रमांकासाठी सर्वात योग्य खेळाडू असल्याचे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दिले आहे. 'लोकेश राहुल सध्या योग्य निवड आहे, परंतु जेव्हा राहुल टॉप ऑर्डरमध्ये जाईल तेव्हा आपण सुरेश रैना आणि युवराज सिंगसारख्या फलंदाजांचा शोध घेत राहिले पाहिजे', असेही मांजरेकरांनी ट्विट करत म्हटले आहे.
हेही वाचा -जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर
ट्विटरवर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर मांजरेकर यांनी राहुलबाबत उत्तर दिले. राहुल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. शिवाय, त्याने यष्टिरक्षणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समालोचकांच्या गटातून हकालपट्टी केली. मांजरेकरांनी सीएएविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या रॅलीचे समर्थन केले होते. बीसीसीआयच्या समालोचन पॅनलमधून वगळण्याचे कारण नागरिकता संशोधन कायद्याला (सीएए) विरोध आणि जेएनयूचे समर्थन असल्याचेही म्हटले जात आहे. त्यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हाणामारीचा विरोध केला होता. मांजरेकर यांनी अनेकदा सीएएचा सार्वजनिक विरोध केलेला आहे.