मुंबई - कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. कोलकाताच्या विजयात युवा सलामीवीर शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ६२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. त्याला इयॉन मॉर्गनने नाबाद ४२ धावा करत चांगली साथ दिली. केकेआरच्या विजयानंतर संघ मालक शाहरुख खानने ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.
शाहरुख खानने केकेआरच्या विजयानंतर एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, संघातील युवा खेळाडूंची चांगला खेळ केला. यात शुबमन गिल, नितीश राणा, शिवम मावी याला शाहरुखने टॅग केले आहे. तर नगरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांचा हॅशटॅग वापरला आहे. खेळाडूंचे अभिनंदन करताना शाहरुखने अनुभवी खेळाडूंनी युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स विरूद्धच्या पहिल्या लढतीमधील निराशाजनक पराभवातून सावरत केकेआरने दुसऱ्या सामन्यात नियोजनबद्ध खेळ केला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तेव्हा कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही आणि हैदराबादचा संघ निर्धारीत २० षटकात ४ बाद १४२ धावापर्यंत पोहोचू शकला.