चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना पार पडला. कोलकाताने या सामन्यात १० धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यात हैदराबादचा युवा खेळाडू अब्दुल समद चांगलाच भाव खाऊन गेला. सद्या सोशल मीडियावर समदच्या फलंदाजीची चर्चा जोरात सुरू आहे.
कोलकाताने नितीश राणा (८०), राहुल त्रिपाठी (५३) आणि दिनेश कार्तिकच्या झटपट २२ धावा याच्या जोरावर १८८ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाची सुरूवात खराब झाली. त्यांची सलामीवीर जोडी १० धावांतच तंबूत परतली. तेव्हा जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे यांनी किल्ला लढवला. दोघांनी सुरूवातीला जम बसेपर्यंत सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्यांनी कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी ९२ धावांची भागिदारी केली.
पॅट कमिन्सने जॉनी बेयरस्टोला (५५) बाद करत हैदराबादला अडचणीत आणले. जॉनी बाद झाल्यानंतर आलेल्या मोहम्मद नबीने संथ खेळ केला. परिणामी धावगती वाढत गेली. नबी आणि त्यानंतर आलेला विजय शंकर बाद झाल्यानंतर अब्दुल समद नावाचे वादळ मैदानात अवतरले. समदने नावाजलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याने कमिन्सला दोन उत्तुंग षटकार ठोकले. पण त्याचे विजयासाठीचे प्रयत्न अपूरे पडले. समद ८ चेंडूत १९ धावांसह नाबाद राहिला.