दुबई - आयपीएल २०२० मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाइट रायडर्सने रोखली. केकेआरने हा सामना ३७ धावांनी जिंकला. पण या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केकेआरच्या फलंदाजांना चांगलेच सतवले. त्याने त्याच्या ४ षटकात तब्बल १४ चेंडू निर्धाव टाकले. जोफ्राने या सामन्यात वेगवान मारा केला.
टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजांना चकवण्यासाठी गतीमध्ये मिश्रण करतात. ते कधी वेगाने चेंडू टाकतात तर कधी धीम्या गतीने चेंडू फेकतात. पण कोलकाता विरुद्धच्या सामन्यात जोफ्राने स्पर्धेतील वेगवान षटक टाकले. त्याने ताशी १४७ किमीच्या वेगाने गोलंदाजी केली. त्यानंतर १४९.९ आणि १४७.८ किमी ताशी वेगाने चेंडू टाकले.
पहिल्या षटकात आर्चरने ताशी १५० किमीपेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे कोलकाताकडून फलंदाजी करणारा आर्चरच्या इंग्लंडच्या संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनला त्याने ताशी १५२ किमी वेगाने चेंडू टाकला.