कोलकाता - ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २८ धावांनी विजय मिळविला. आयपीएलमधील हा त्याचा सलग दुसरा विजय ठरला. केकेआरने दिलेल्या २१९ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघास ४ बाद १९० धावा करता आल्या.
केकेआरने दिलेल्या डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. के.एल. राहुल १ धावांवर परतला. त्यानंतर ख्रिस गेल २ षटकार आणि २ चौकार ठोकत २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर मयंक अगरवालने ६ चौकार आणि १ षटकारसह ५८ धावा झोडपून काढल्या.
डेव्हिड मिलरने झटपट ५९ धावांची खेळी केली, पण ती खेळी संघास विजय मिळवून देऊ शकली नाही. मनदीप सिंग ३३ धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून आंद्रे रसेलने भेदक गोलंदाजी करत ३ षटकात २१ धावा देत २ गडी बाद केले. पीयुष चावला आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.