दुबई - बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीची भारतीय संघात निवड केली आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १२ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या, त्यामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विकेटचाही समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळलेल्या सामन्यात चक्रवर्तीने आपल्या अंतिम षटकात माजी भारतीय कर्णधार धोनीला बाद केले. या सामन्यानंतर कोलकाताने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला 'टीप्स' देताना आढळला.
धोनीचा एकाच हंगामात दोनवेळा त्रिफळा उडवणारा दुसरा गोलंदाज हा बहुमान वरुण चक्रवर्तीला मिळाला आहे. याआधी लसिथ मलिंगाला अशी कामगिरी जमली होती. चक्रवर्तीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विलक्षण कामगिरी बजावली. त्याने ४ षटकांत २० धावा देऊन २ फलंदाज माघारी धाडले. शेवटच्या षटकात धोनीची विकेट घेण्यापूर्वी वरुणने शेन वॉटसनची विकेटही घेतली.
कोलकातावर चेन्नईची बाजी -
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील पाचवा विजय आहे. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजाने महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला १७३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने ४ विकेट्स गमावून २० षटकात पूर्ण केला.