नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा वेगनवान गोलंदाज केन रिचर्ड्सनची कोरोना चाचणी 'नेगेटिव्ह' ठरल्यानंतर, न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनची कोरोना चाचणी समोर आली आहे. या चाचणीत फर्ग्युसनला कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा -कोरोनाचा राग चीनवर..! भडकलेला शोएब म्हणाला.. तुम्ही वटवाघुळं, कुत्रे कसं खाऊ शकता?
शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर फर्ग्युसनला घशात त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याला संघापासून वेगळे करण्यात आले होते. या अगोदर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रिचर्डसनचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यात कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रिचर्डसनचे संघात पुनरागमन झाले होते.
पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मालिका रद्द करण्यात आली आहे. सिडनीतील रिकाम्या स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड संघ आपल्या घरी परतला आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. बऱ्याच स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवल्या जात आहेत. एकंदरीत, कोरोनामुळे हे वर्ष क्रीडाक्षेत्रासाठी कठीण झाले आहे.