अबुधाबी - कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) त्रिनबागो नाइट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड शनिवारी मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला. मुंबई इंडियन्सने ट्विट करून ही माहिती दिली. पोलार्डसोबत शेरफाने रूदरफोर्डही आपल्या कुटुंबासमवेत अबुधाबीला पोहोचला.
सीपीएल संपल्यानंतर पोलार्ड व्यतिरिक्त वेस्ट इंडीजचे इतरही अनेक खेळाडू यूएईला पोहोचले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईमध्ये आयपीएल स्पर्धा अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथे खेळली जाईल.
संघमालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने सीपीएलचा किताब पटकावल्यानंतर त्रिनबागो नाइट रायडर्सचे अभिनंदन केले आहे. ट्विटरवर एक फोटो पोस्ट करताना शाहरुखने डॅरेन ब्राव्हो, कर्णधार पोलार्ड, अंतिम सामन्याचा नायक लेंडल सिमन्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचे आभार मानले आहेत.
२०१५, २०१७ आणि २०१८नंतर टीकेआरचे हे चौथे सीपीएल विजेतेपद आहे. यंदाच्या सीपीएलच्या हंगामात टीकेआरने सर्व दहा सामने जिंकले. सेंट लुसिया झोक्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीकेआरने १८.१ षटकांत ८ गडी राखून १५५ धावांचे लक्ष्य पूर्ण करत चौथ्यांदा कॅरेबियन प्रीमियम लीगचा विजेता होण्याचा मान मिळवला. अंतिम सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात आला.